मोहसडव्यासह 3 लाखाहून अधिकचा मुद्देमाल नष्ट

मोहसडव्यासह 3 लाखाहून अधिकचा मुद्देमाल नष्ट

गडचिरोली पोलीस व मुक्तीपथची संयुक्त कारवाई

गडचिरोली, 31 डिसेंबर :- तालुक्यातील मुरुमबोडी-बोथेडा जंगल परिसरात शोधमोहीम राबवून 3 लाखाहून अधिक रुपयांचा मोहफुलाचा सडवा व साहित्य गडचिरोली पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या नष्ट केले.

मुरूमबोडी व बोथेडा या दोन्ही गावात अवैध दारूची विक्री केली जाते. जिल्हा मुख्यालयासह बामणी, मुरमाडी, मेंढा यासह गावातील किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठा केला जातो. मावळत्या वर्षाला 31 डिसेंबर व नववर्षाच्या स्वागतार्थ मोठ्या प्रमाणात दारूविक्री करून पैसे कमविण्यासाठी काही विक्रेत्यांनी मुरुमबोडी जंगलातील नाल्यालगत हातभट्टी लावली असल्याची गुप्त माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने जंगलपरिसरात शोधमोहीम राबविली असता, सात दारुअड्डे आढळून आले. सोबतच दोन ठिकाणी दारू गाळली जात होती. पोलिसांना बघताच विक्रेत्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी 42 ड्रम मोहफुलाचा सडवा, 35 जर्मनी केतल्या व साहित्य असा एकूण 3 लाख किंमतीपेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल नष्ट करीत दारू विक्रेत्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरण्यात पोलिस व मुक्तीपथ तालुका चमुला यश आले.

सदर कारवाई पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी पथकातील धनराज चौधरी, परशुराम हलामी, सचिन आळे, सुजाता ठोंबरे, मुक्तीपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम , स्पार्क कार्यकर्ती स्वीटी आकरे यांनी केली.

error: Content is protected !!