भंडारा जिल्हा कोरोनामुक्तच ठेवा –  डॉ. विश्वजीत कदम

भंडारा जिल्हा कोरोनामुक्तच ठेवा – डॉ. विश्वजीत कदम

लॉकडाऊनचे काटेकोर पालन करा, सोशल डिस्टन्सिंग एकमेव उपाय

भंडारा 18 : कोरोनाचा संसर्ग संपूर्ण जगभर सुरू आहे. महाराष्ट्रातील भंडारा आणि काही मोजके जिल्हे वगळता बहुतांश जिल्ह्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी या आदेशासह भंडाऱ्याच्या जनतेने, लोकप्रतिनिधी आणि  प्रशासकीय  अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या सर्व   उपाययोजना करीत सकारात्मक  भुमिका घेतल्याने भंडारा जिल्हा कोरोना निगेटिव्ह झाला आहे. असे असले तरी विषाणूशी लढा अजून संपला नाही. नागरिकांनी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने संयम आणि जबाबदारीचे भान राखून जगासमोर आदर्श निर्माण केला आहे.  यापुढेही  सोशल डिस्टन्सिंग सोबतच शासनाने  दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून आपला जिल्हा शेवटच्या क्षणापर्यंत कोरोनामुक्त ठेवावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत असतांना साथरोग संसर्ग पहिल्या टप्प्यात रोखणे हेच खरे आव्हान होते. कोरोनामुक्त भंडारा जिल्हा ठेवण्यात जिल्हाधिकारी व प्रशासन यशस्वी झाले आहे. असे असले तरी युद्ध अजून संपले नाही. जिल्ह्यातील नागरिकांनी आजपर्यंत सहकार्य केले आहे. या पुढील काळातही शासनाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन नागरिकांनी केल्यास भंडारा जिल्हा कोरोनामुक्त राहील आणि कोरोना विरुद्धची लढाई आपण निश्चित जिंकू असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

पहिल्या लॉक डाऊनमध्ये आपण शून्यावर आहोत. आता लॉक डाऊन ०.२ सुरू झाला आहे. हा खरा कसोटीचा काळ असणार आहे. आरोग्यासोबतच आर्थिक उपाययोजना आखाव्या लागणार आहेत. यादृष्टीने शासनाने युध्दस्तरावर पावले उचलली आहेत. जिल्ह्यात कोणीही उपाशी राहणार नाही तसेच कुणाचाही रोजगार जाणार नाही यासाठी खबरदारी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. औषधी व जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. भाजीपाला व किराणा धान्य खरेदी करतांना गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग व नियमांचे पालन करावे. आरोग्य यंत्रणा आपल्या सेवेसाठी सज्ज असून त्यांना सहकार्य करावे, असे ते म्हणाले.

लॉकडाऊन काळात बेघर, विस्थापित व भिकारी यांची व्यवस्था निवारागृहात करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या जिल्ह्यातील ९ वसतिगृहात निवारागृह सुरू करण्यात आले आहेत. निवारागृहात आश्रयास असणाऱ्या व्यक्तींना भोजन, वैद्यकीय तपासणी, मानसोपचार व आवश्यकता असल्यास कपडे आदी सुविधा पुरविण्यात येत आहेत. ६३७ व्यक्तींना निवारागृहात आश्रय दिला आहे. शिवभोजन केंद्रातून मोफत जेवणाची सोय सुद्धा करण्यात आली आहे. आजपर्यंत दोन केंद्रातून ५ हजार थाळी भोजन मोफत वितरित करण्यात आले आहे. शिवभोजन आता तालुकास्तरावर सुरू करण्यात आले आहे.

गरजूंना धान्य वाटप सुरू

संचारबंदी काळात जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटप सुरू आहे. आतापर्यंत ६०  हजार क्विंटल धान्य वाटप करण्यात आले असून ११ हजार ४४८ मेट्रिक टन अन्न धान्य उपलब्ध होणार आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार या व्यवस्थेवर लक्ष ठेऊन आहेत. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शासन प्रशासन मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करून देत आहे, पालकमंत्री म्हणून आपण स्वतः व्यवस्थेवर लक्ष ठेऊन आहे.

अफवांवर विश्वास ठेऊ नका, जाणते-अजाणतेपणी  अफवा पसरवू नका,  अकारण घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा व आपला भंडारा जिल्हा शेवटच्या क्षणापर्यंत कोरोना मुक्त ठेवा, असे आवाहन करतांनाच, विषाणूची ही लढाई आपण नक्की जिंकणार असा दृढ निश्चय पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
error: Content is protected !!