गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस १४ वर्षांचा सश्रम कारावास

गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस १४ वर्षांचा सश्रम कारावास

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल ; सात हजारांचा दंडही ठोठावला

गोंदिया, ०२ मे :- एकटीच घरी असलेल्या गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ वर्षांचा सश्रम कारावास व सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सोमवारी (दि. २९) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी ही सुनावणी केली आहे. या प्रकरणात शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव निरंजन पुरुषोत्तम चवरे (४१, ता. अर्जुनी- मोरगाव), असे आहे.

१० जानेवारी २०१८ रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील एका छोट्याशा गावातील २४ वर्षीय गतिमंद मुलगी आई-वडील मजुरीच्या कामाला बाहेर गेल्याने घरी एकटीच होती. ही संधी साधून निरंजन चवरे याने तिला बाथरुमध्ये नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला होता. यावेळी पीडित तरुणी रडल्यामुळे शेजारी राहणाऱ्या महिलेने पाहिले. आरोपीला यासंदर्भात हटकले असता आरोपी तेथून पळून गेला. त्या महिलेने पीडितेच्या आई-वडिलांना सांगितले असता तिच्या आईने १० जानेवारी २०१८ रोजी अर्जुनी- मोरगाव येथे आरोपीविरुद्ध तक्रार दिली होती. यावरून आरोपीविरुद्ध कलम ३७६ (२) (जे) (एल), ४५० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अनिल कुंभरे यांनी केला.

या प्रकरणात आरोपीविरुद्ध दोष सिद्ध करण्यासाठी सरकारतर्फे सहायक सरकारी वकील वसंत चुटे यांनी एकूण सात साक्षीदारांची साक्ष व इतर कागदोपत्री दस्तऐवज न्यायालयासमोर सादर केले. एकंदरीत आरोपीचे वकील व पीडितेचे सहायक सरकारी वकील कृष्णा पारधी यांच्या सविस्तर युक्तिवादानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.टी. वानखेडे यांनी आरोपीविरुद्ध सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून आरोपी निरंजन चवरे याला भारतीय दंड विधान कलम ३७६ (२) (जे) (एल) अंतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास ३ महिन्यांचा अतिरिक्त कारावास. तसेच भारतीय दंड विधान कलम ४५० अंतर्गत ४ वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन महिन्यांचा अतिरिक्त कारावास, असा एकूण १४ वर्षांचा सश्रम कारावास व सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

error: Content is protected !!