सहायक संचालक डॉ. गवई यांनी घेतला गोरेगाव तालुक्याचा आढावा 

सहायक संचालक डॉ. गवई यांनी घेतला गोरेगाव तालुक्याचा आढावा 

ग्रामीण रुग्णालयाला भेट ; कर्मचाऱ्यांचा सत्कार

गोंदिया, ०३ मे :- सहायक संचालक डॉ. गवई यांनी सोमवारी (दि. २९) जिल्ह्यात भेट देऊन गोरेगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली व तालुक्याचा आढावा घेतला. याप्रसंगी त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आवश्यक त्या सूचना केल्या. सोबतच उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा त्यांनी सत्कारही केला.

डॉ. गवई यांनी सर्वप्रथम जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांची भेट घेतली. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील दालनात जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक व कार्यक्रम समन्वयकांची सभा घेऊन राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात माता व बाल मृत्यू होऊ न देता सर्व आरोग्य कार्यक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

सभेला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे सुद्धा उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी गोरेगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य संस्थेद्वारे देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात त्यांनी औषधी भांडार, लसीकरण कक्ष, शीतसाखळी गृह व त्यातील उपकरण, प्रसूतिगृह, शल्यचिकित्सा गृह, वॉर्डचे निरीक्षण केले. पश्चात, तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या आरोग्य संस्था आढावा बैठकीत उपस्थित राहून तालुक्यातील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेतला. सभेला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद चव्हाणसह पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सहायिका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी तसेच उपकेंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा सेविका उपस्थित होते.

आढावा सभेदरम्यान सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम जसे माता व बाल संगोपन, हिवपात, क्षयरोग, कुष्ठरोग, सिकलसेल, हत्तीपाय रोग, अॅनिमिया मुक्त भारत अभियान, प्रसूती, नियमित लसीकरण, कुपोषण, नवसंजीवनी योजना, साथरोग, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम, बाल सुरक्षा कार्यक्रम आदी विविध बाबींचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. त्यांनी, उत्तम देखभाल तसेच वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून दिल्या जात असलेल्या आरोग्य सेवेप्रति आनंद व्यक्त केला.

याप्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन कापसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. के. पटले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद चव्हाण उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. गवई यांच्या हस्ते तालुक्यात आरोग्यविषयक उत्तम काम केलेले कर्मचारी मोहगाव येथील एस. टी. भगत व पुष्पा खोब्रागडे बोळुंदा येथील समुदाय आरोग्य अधिकारी खुशबू ठाकूर व बबिता रहांगडाले, कवलेवाडा येथील सुनीता रहांगडाले व माधुरी धकिते, चिचगाव येथील वनिता वाटकर, हिरापूर येथील समुदाय आरोग्य अधिकारी विद्या रहांगडाले व प्रेमलता बिसेन, कुहाडी येथील आय. डी. पटले यांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!