अवैधरित्या रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त 

अवैधरित्या रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त 

वनविभागाची कारवाई 

सडक अर्जुनी, ०३ मे :- येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयअंतर्गत येणाऱ्या सहवनक्षेत्र कार्यालय कोसमतोंडी परिसरात सामूहिक गस्त करीत असताना गोंगले बीटमधील कंपार्टमेंट क्रमांक- १३३५ मध्ये रविवारी रात्री १२ वाजेदरम्यान रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर वनविभागाच्या पथकाने पकडले.

गेल्या अनेक महिन्यांपासून कोसमतोंडी परिसरात अवैध सागवान तस्करी, रेती तस्करी तसेच वनविभागाच्या जंगलात अतिक्रमण होत असल्याची चर्चा तालुक्यात होती. त्याअनुषंगाने वरिष्ठ वनअधिकारी कंबर कसून रेतीमाफियांचे मुसक्या बांधण्याचा प्रयत्न करीत आहे. अशातच रविवारी सहवनक्षेत्र कार्यालय कोसमतोंडी परिसरात वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक फूलचंद शेंडे, वनरक्षक राम सिसोदे, ठाकरे, मंदा बिसेन, धनभाते, नागपुरे व वनमजूर सामूहिक गस्त करीत असताना गोंगले बीटमधील कंपार्टमेंट क्रमांक-१३३५ मध्ये रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर त्यांच्या हाती लागले. याप्रकरणी आरोपी अक्षय शहारे व सुरेंद्र इडपाचे (दोघे रा. रेंगेपार) यांच्यावर वनगुन्हा दखल करून पुढील तपास सुरू आहे. रेती ट्रॅक्टर पकडल्याने कोसमतोंडी, डुडा, गोंगले, रेंगेपार, मालीजुंगा परिसरातील रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. कोसमतोंडी परिसर जंगलव्याप्त असल्याने रेती तस्करांनी जंगलातूनच झाडांची नासाडी करून मोठमोठे रस्ते तयार केले आहेत. ते रस्ते बंद करण्याची नितांत गरज आहे.

error: Content is protected !!