जिल्ह्यात मार्कंडा, सोमनूरसह अनेक ठिकाणी पर्यटनाला संधी

जिल्ह्यात मार्कंडा, सोमनूरसह अनेक ठिकाणी पर्यटनाला संधी

पर्यटनाकडे सरकारने लक्ष दिल्यास बदलु शकते जिल्हयाची ओळख

गडचिरोली, २५ डिसेंबर :- गडचिरोली हा निसर्गाचे वरदान लाभलेला जिल्हा आहे. राज्यातील ७० टक्के वनक्षेत्र या जिल्ह्यात आहे. नद्या, त्रिवेणी संगम, पुरातन मंदिरे, किल्ले, अभयारण्य याठिकाणी पर्यटनाला भरपूर वाव आहे. सरकारने याकडे लक्ष देऊन विकास केल्यास माओवाद्यांच्या कारवाया असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला पर्यटनस्थळाची नवी ओळख मिळू शकेल.

मार्कंडा हे जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. हेमाडपंथी मंदिराचा समूह या ठिकाणी आहे. वैनगंगा नदीच्या काठावर चामोर्शी तालुक्यात पुरातन मार्कंडेश्वराच मंदिर आहे. या ठिकाणी वैनगंगा नदी उत्तरवाहिनी झाली आहे. मंदिरावर खजुराहोसारखे देखावे कोरण्यात आले आहेत. दरवर्षी महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात विदर्भातून मोठ्या प्रमाणात भाविक येथे दर्शनासाठी येतात. विदर्भाची काशी अशी ओळख असलेल्या मार्कंडाला तीर्थक्षेत्राचा दर्जा असला तरी सरकारने पाहिजे तशा सोयी उपलब्ध करून दिलेल्या नाही.

सिरोंचा तालुक्यात सोमनूर येथे त्रिवेणी संगम आहे. या ठिकाणी गोदावरी, इंद्रावती नद्यांच्या संगमासह तीन राज्यांच्या सीमा एकत्रीत येतात. या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. सोमनूरच्या विकासासाठी प्रस्ताव तयार होऊनही प्रशासकीय पातळीवर विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. याच तालुक्यात नगरमच्या सीमेवर ज्या ठिकाणी प्राणहिता नदी गोदावरी नदीत विलीन होते तिथे सरस्वती अदृष्य नदी असून या त्रिवेणी संगमाच्या पलीकडे तेलंगणच्या हद्दीत कालेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे. वर्षभरात लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. सिरोंचाला येऊन नदी पार करून भाविक कालेश्वरला जातात. नगरम गावाजवळ पर्यटनाच्या दृष्टीने सरकारने सुविधा उपलब्ध करुन दिल्यास चांगले पर्यटनस्थळ विकसीत होऊ शकते.

सिरोंचा तालुक्यात डायनासोर आणि जीवाश्माचे अवशेष आढळल्यानंतर वनविभाग वडदम येथे राज्यातील पहिले जीवाश्म पार्क उभारत आहे. या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने वनविभागाने सोयी उपलब्ध केल्यास पर्यटनाची चांगली संधी निर्माण होऊ शकते. अहेरी तालुक्यात वेंकटापूर येथे गरम पाण्याचे कुंड आहे. जीतम आणि बिनागुंडा इथे धबधबा आहे. एकूणच वनपर्यटनासंदर्भात जिल्ह्यात भरपूर वाव आहे.

चपराळा, टिपागड, वैरागड येथे संधी

जिल्ह्यात चपराळा हे अभयारण्य असले तरी वन्यप्राणी मात्र नावालाच आहेत. या ठिकाणी जुने मंदिर आहे. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रेलचेल असते. चपराळा येथे वर्धा आणि वैनगंगा नदीचा संगमातून प्राणहिता नदी तयार होऊन पुढे वाहते. वनविभागाने काही सोयी केल्यास पर्यटनाच्या दृष्टीने चपराळा एक चांगले पर्यटनस्थळ होऊ शकते. जिल्ह्यात टिपागड आणि वैरागडला जुने किल्ले आहे. आता देखभालीअभावी ते ढासळले आहेत. या ठिकाणी लक्ष दिल्यास चांगले पर्यटनस्थळ होऊ शकते.

हेमलकसाला हव्यात सुविधा

भामरागड तालुक्यात हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांच्यावरील चित्रपटानंतर हेमलकसाला येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे. पर्लकोटा आणि इंद्रावती नदीचा संगम या ठिकाणी आहे. हेमलकसाला सरकारने पर्यटनक्षेत्र घोषीत केले आहे. मात्र भामरागडमध्ये पर्यटकांना थांबण्याची व्यवस्था नाही.

error: Content is protected !!