गरोदर स्त्रिया व स्तनदा माता अमृत आहारापासून वंचित

गरोदर स्त्रिया व स्तनदा माता अमृत आहारापासून वंचित

आलापल्लीतील धक्कादायक प्रकार ; एकाच अधिकाऱ्याकडे तीन तालुक्याचा कार्यभार….

आनंद दहागावकर, संपादक, गोंडवाना महाराष्ट्र ब्रॉडकॉस्ट न्युज.

गडचिरोली, ०२ जानेवारी :- गरोदरपणी गर्भाचे पोषण हे आईच्या अन्नावरच होत असते. त्यामुळे आईने दीडपट आहार घेतला पाहिजे या उद्देशाने शासनाकडून गर्भवती स्त्रिया व स्तनदा मातांना सकस व पोषण आहाराचा लाभ दिला जातो. शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत 2009 मध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. टीएचआर (टेक होम रेशन) योजनेअंतर्गत गर्भवती व स्तनदा मातांना गहू,चना,मुंगडाळ या धाण्यासह सोयाबीन तेल, हळद, तिखट, मीठ या साहित्याचे वाटप केले जाते. मात्र, अहेरी तालुका मुख्यालयपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आलापल्ली सारख्या शहरात मागील तीन महिन्यापासून गर्भवती स्त्रिया व स्तनदा मातांना टीएचआर वाटप करण्यात आले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त आहे. हा प्रमाण आदिवासी समाजामध्ये अधिक आहे. स्त्रियांच्या गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाही मध्ये वजन वाढीचे प्रमाण कमी असल्याने याचा परिणाम बाळाच्या वजनावर होतो शिवाय जन्मानंतर पहिले तीन महिने बालक पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्याने या कालावधीत मातेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शासनातर्फे अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडी क्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना आहारातून उष्मांक व प्रथिनांची उपलब्धता होण्यासाठी भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत एक वेळ चौरस आहार उपलब्ध करून दिला जातो. यासाठी शासनातर्फे कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जातो. मात्र, तीन-तीन महिने गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना हा सकस आहार मिळत नसेल तर कुपोषण, बालमृत्यू व कमी वजनाची बालके जन्माला येणे यासारखी गंभीर समस्यावर मात कसे होणार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

अहेरी तालुक्यात अहेरी बिटात 32, आलापल्ली 34, देचली 31, जिमलगट्टा 34,कमलापूर 48, महागाव 37, पेरमिली 37 असे 7 बिटातून 73 मिनी आणि 180 मेन असे 253 अंगणवाड्या चालविले जातात. तर, एच.ए. कन्नाके यांच्याकडे अहेरी, जिमलगट्टा बिट, बी.डी. नुकलवार यांच्याकडे आलापल्ली व पेरमिली, वाय.डी. मालखेडे यांच्याकडे कमलापूर व देचली आणि एम.ए. डहाके यांच्याकडे महागाव बिट आहे. विशेष म्हणजे आर.एस. चव्हाण बालविकास प्रकल्प अधिकारी, भामरागड यांच्याकडे एटापल्ली आणि अहेरी येथील अतिरिक्त प्रभार असल्याची माहिती आहे.

आलापल्ली शहरातील या एकाच अंगणवाडीत अशी स्थिती नसून आणखी बरेच अंगणवाडीत असा प्रकार समोर आला आहे. तर एटापल्ली आणि भामरागड सारख्या अतिदुर्गम व आदिवासीबहुल भागात काय स्थिती असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद हे आरोग्य आणि शिक्षणावर उत्तम काम करत आहेत. कोरोना काळात त्यांनी अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात स्वतः दौरे करून लसीकरण मोहीम योग्यरीत्या राबवून घेतली. कुपोषण कमी करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असताना अहेरी तालुक्यातील आलापल्लीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मी गरोदर असल्यापासून केवळ दोनदा सकस आहार मिळाला. आता मला १८ दिवसांची मुलगी आहे. मात्र, अंगणवाडीत जाऊनही मागील तीन महिन्यांपासून सकस आहार मिळाला नाही.

– सुंदरा चंद्रकांत मारशेट्टीवार, लाभार्थी आलापल्ली

कुपोषण, बालमृत्यू आणि कमी वजनाची बालके जन्माला येणे यासारख्या गंभीर समस्येवर | मात करण्यासाठी आदिवासीबहुल क्षेत्रात माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने अमृत आहार योजना चालविली जाते. या योजनेत शासनातर्फे कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. मात्र तीन-तीन महिने गरोदर व स्तनदा महिलांना सकस आहार मिळत नसेल तर हा निधी जातो कुठे? याची योग्य चौकशी व्हायला पाहिजे आणि लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे.

– कैलास कोरेत, जिल्हा महासचिव रायुकाँ, गडचिरोली

माझ्याकडे सप्टेंबरपर्यंत टीएचआर (टेक होम रेशन) प्राप्त झाले असून ते वाटप करण्यात आले. त्यानंतर ऑक्टोबरपासून सकस आहार मिळाला नाही. लाभार्थी येऊन विचारतात मात्र, टीएचआर प्राप्त झालेच नाही तर कसे काय वाटप करणार? सकस आहार प्राप्त होताच वाटप करण्यात येईल.

– शुभिता मेश्राम, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी केंद्र क्र. ११, आलापल्ली

error: Content is protected !!