यशोगाथा : भाजीपाला व मनेरी व्यवसायातून उदरनिर्वाह

यशोगाथा : भाजीपाला व मनेरी व्यवसायातून उदरनिर्वाह

समीक्षा फटीक यांच्या शब्दात ऐकूया त्यांची यशोगाथा…

मी समीक्षा समीर फटीक, मु. मारेगाव, ता. तिरोडा. मारेगाव हे तिरोडा पासून दक्षिणेला 15 किमी अंतरावर सर्रा मार्गावर मुख्य रस्त्यापासून 3 किमी आतमध्ये 871 कुटूंब संख्या असलेले गाव आहे. माझ्या गावात 17 स्वयं सहायता महिला बचत गट आहेत. माझ्या गटात 14 सदस्या आहेत. माझ्या गटाची स्थापना 11 मार्च 2014 मध्ये झाली. मी या गटात सदस्य आहे. माझ्या गटाला 15 हजार रुपये फिरता निधी मिळाला आहे. सासू, सासरे, दोन मुले, माझे पती व मी असा माझा सहा जणांचा कुटूंब आहे. माझ्या घरी शेती नाही त्यामुळे घर कसे चालवावे हा प्रश्न नेहमी पडतो. आयसीआयसीआय बँकेतून 50 हजार कर्ज घेऊन कपडा व्यवसाय सुरु केला. गावोगावी बाजारात जाऊन कपडे विकणे व मंडईमध्ये खेळणे विकून आम्ही आमचा उदरनिर्वाह चालवित होतो. परंतू कोरोनामुळे आमचे सर्व जीवन विस्कटले.

मार्च 2020 पासून कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला व संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्यात आले. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाची घडी पुर्णपणे विस्कटून गेली. त्याची झळ आमच्याही कुटूंबाला सोसावी लागली. माझ्या सहयोगिनी भारती लांजेवार यांनी फोनवर हालचाल विचारला व कोरोना कालावधीत आपण काय नविन काम किंवा गावातील व्यक्तीसाठी काय करता येईल यासंबंधी चर्चा केली. तेव्हा मला त्यांनी सूचविले की, तुमच्या गावी बाजार भरत नाही, वडेगाव बाजारात भाजी माल घेण्यासाठी जावे लागते. पण लॉकडाऊन काळात बाजार भरत नसल्याने भाजीसाठी सर्वांचे हाल होत होते, म्हणून तुम्ही भाजीपाला सुध्दा विकू शकता. तेव्हा मी मणेरी माल व वाडीवरुन भाजीपाला घेऊन गावामध्ये भाजीचा व मणेरी सामान विकण्याचा निर्णय घेतला. या माझ्या निर्णयाला माझ्या पतीनेही पाठींबा दिला. एप्रिल 2020 ला मी माझ्या गटातून 25 हजार रुपये कर्ज घेऊन भाजीचा माल विकत आणला. कधी मी व माझे पती आम्ही दोघेही स्कुटीवर व सायकलवर गावामध्ये व बाहेरगावी भाजीचा माल विकतो. मी मणेरी सामान व माझे पती भाजीपाला विकतात. दररोज 500 ते 700 रुपये अशी विक्री होते. त्यातून निव्वळ नफा 150 ते 200 रुपये इतका होतो. घरपोच भाजीचा माल उपलब्ध असल्यामुळे सर्व गावकरी संतुष्ट झाले व मलाही गावासाठी काहीतरी करण्याचे समाधान मिळाले. हे सर्व शक्य झाले ते महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहयोगिनी व सीआरपी (सामुदायिक संसाधन व्यक्ती) ताईच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे. आता मी फक्त चुल व मुल यामध्ये न अडकून राहता स्वत: काहीतरी करुन दाखवू शकते हा आत्मविश्वास फक्त आणि फक्त बचत गटात येण्यामुळे झाले. मी महिला आर्थिक विकास महामंडळाचे खूप खूप आभारी आहे, अशा त्या यावेळी म्हणाल्या.

error: Content is protected !!