महाराष्ट्रातील आदिम जमातींच्या बांधवांसाठी ‘आदिम वाणी’ नावाचे सामुदायिक रेडिओ केंद्र सुरु

महाराष्ट्रातील आदिम जमातींच्या बांधवांसाठी ‘आदिम वाणी’ नावाचे सामुदायिक रेडिओ केंद्र सुरु

पुणे, २७ जून :- आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी राज्यातील कातकरी, कोलाम व माडीया आदिम जमातींच्या बांधवांसाठी ‘आदिमवाणी’ नावाचे सामुदायिक रेडिओचे मुख्य केंद्र पुणे येथे कार्यान्वीत केले असून २१ जून रोजी, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर सदर उद्घाटन सोहळा पार पडला. या रेडिओ केंद्राचे प्रक्षेपण नियमितपणे चालू होणार असून याद्वारे आदिम जमातींना लाभ मिळवून देणारी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे सोपे होणार आहे, तसेच या रेडिओच्या माध्यमातून शासन आणि आदिम आदिवासी जमाती यांच्यात सुसंवाद निर्माण होण्यास मदत होणार आहे.

आदिवासी भागामध्ये महिलांना त्यांचे हक्क, त्यांच्यासाठी योग्य कायदेशीर सल्ला-सहाय्य आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठीची माहिती पोहोचवणे,  आदिवासी नव युवकांना नवीन कामाच्या संधी आणि स्वयंरोजगाराच्या विविध मार्गांबद्दलची माहिती कुणी देणे, आदिवासी शेतकरी मित्रांसाठी नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञान, बियाणे आणि रोपांची खरेदी, तसेच जतन पद्धती आणि विक्री याबद्दल उपयुक्त माहिती देणे, आदिवासी मुला-मुलींना पौगंडावस्थेतील शारीरिक आणि मानसिक बदलांबद्दलची माहिती देणे, शाळकरी मुलांना आणि शाळा मध्येच सुटलेल्यांना शिक्षणाचे इतर मार्ग दाखवणे या सर्व गोष्टी सामुदायिक रेडिओ कार्यक्रमांद्वारे दुर्गमातल्या दुर्गम भागातल्या आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवणे सहज साध्य होणार आहे.

तसेच आदिम आदिवासी समाजामध्ये देखील कलाकार मंडळी असून या रेडिओच्या माध्यमातून त्यांना आपली कला समाजासमोर ठेवण्याची संधी मिळणार आहे. श्रोत्यांनाही इथे कामाच्या उपयुक्त गोष्टींसोबतच परंपरागत आदिवासी संगीत आणि लोकगीते यांचा आस्वाद घेता येणार आहे.

सदर केंद्रासाठी तज्ञ व्यक्तिंची निवड करण्यात आलेली असून उत्तमोत्तम दर्जाचे कार्यक्रम आदिम जन माणसांपर्यंत पोचवण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना या रेडिओशी जोडण्यासाठी राज्याच्या अन्य ३ भागात केंद्र उभारली जात असून त्यासाठी शहापुर, यवतमाळ आणि गडचिरोली या शहरांची निवड नक्की करण्यात आली.

या उद्घाटन सोहळ्यास आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड व मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना डॉ. राजेंद्र भारूड यांनी आजच्या काळातही दुर्गम भागात रेडिओचे महत्व खूप मोठे असल्याचे सांगत या रेडिओ केंद्रामुळे आदिवासी बांधवांचा कसा दूरगामी फायदा होणार आहे हे विशद केले. आदिमवाणी नियमित ऐकल्याने आदिवासी बांधवांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

error: Content is protected !!