लोकहितासाठी सदैव झटलेले व्यक्तिमत्व ; स्व. राजे सत्यवानराव महाराज

लोकहितासाठी सदैव झटलेले व्यक्तिमत्व ; स्व. राजे सत्यवानराव महाराज

पुण्यतिथी विशेष…

अहेरी इस्टेटचे कैलासवासी श्रीमंत स्व. राजे सत्यवानराव महाराज यांची आज सोमवार, 17 जुलै रोजी पुण्यतिथी असून त्या निमित्याने लोकहिताचे विचार करून सदैव झटलेले व्यक्तिमत्त्वाचे धनी स्व. राजे सत्यवानराव महाराज यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!

स्व. राजे सत्यवानराव महाराज नेहमी लोकाभिमुख कार्य करायचे मुळात राजघराण्याचे असल्याने राजकीय सत्ता असो की नसो याची यत्किंचितही विचार न करता अविरत व अविश्रांत कार्य केले.

पिताश्री स्व. राजे विश्वेश्वरराव महाराज यांच्याकडून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व संघर्षाचे धडे गिरवून स्व. राजे सत्यवानराव महाराज सुद्धा पिताश्रींच्या पाऊलावर पाऊल टाकून नागपूर राजधानीसह वेगळ्या विदर्भासाठी झटले.

नाग विदर्भ आंदोलन समितीच्या माध्यमातून सन 1985 ते 1990 आणि 1995 ते 1997 पर्यंत असे दोनदा राज्यविधिमंडळाचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केले. स्व. महाराजांचा सुद्धा पिताश्री सारखेच दबदबा व दरारा होता. व्यक्तिमत्वातही वेगळा रुबाब होता.

स्व. राजे सत्यवानराव महाराज आमदारकी व राजकीय क्षेत्रातून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागाच्या आदिवासी बहुल, जंगलव्याप्त, अतिदुर्गम भागाच्या विकासासाठी धडपडले, नव्हे; खऱ्या अर्थाने विकासाची मशाल पेटविले.

गावात रस्ते, वीज, आरोग्य, सिंचन पोहचत नसेल तर विकास शक्य नाही हे हेरून  गावातील रास्त व मूलभूत गरजा पोहचविण्याचे महान कार्य स्व. सत्यवानराव महाराजांनी केले.

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही यासाठी पिताश्री स्व. राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी सन 1958 साली  राजे धर्मराव महाराज यांच्या नावाने राजे धर्मराव शिक्षण मंडळाची स्थापना करून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवले. तर स्व. राजे सत्यवानराव महाराज यांनी शिक्षणाचे जाळे अहेरी उपविभागात पसरवून या भागात शिक्षणाच्या सोयी-सुविधा, संधी उपलब्ध करून दिले. आज जिल्ह्यातील व प्रामुख्याने अहेरी उपविभागातील असंख्य मुले-मुली शिक्षण व पदव्या घेऊन शासकीय अधिकारी, कर्मचारी व अन्य विविध क्षेत्रात कार्यरत असून आजही अखंडीतपणे शिक्षण संस्थेतून विद्यादानाचे पावित्र्य कार्य सुरूच आहे. वडिलांप्रमाणेच स्व. राजे सत्यवानराव महाराज यांची ‘शिक्षण महर्षी’ म्हणून ओळख आणि ख्याती बनली आहे.

स्व. राजे सत्यवानराव महाराज यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, कला, पर्यावरण क्षेत्रात भरीव कामगिरी केले असून आज अहेरी इस्टेटचे राजे कैलासवासी श्रीमंत राजे सत्यवानराव महाराज यांची पुण्यतिथी असून स्व. महाराजांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!

‘असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा!

गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा!!’

भावपूर्ण श्रद्धांजली!

✍️✍️जयश्री खोंडे, अहेरी

error: Content is protected !!