शेतीच्या बांधावर भरली चिमुकल्यांची शाळा!

शेतीच्या बांधावर भरली चिमुकल्यांची शाळा!

विद्यार्थ्यांनी धान रोवणी करत घेतली शेतीविषयक माहिती ; वाळवी येथे ‘एक दिवस शेतीचा’ उपक्रम

एटापल्ली, ०७ ऑगस्ट :- तालुक्यातील वाळवी जिल्हा शाळेत ‘एक दिवस शेतीचा’ उपक्रम राबविण्यात आला. या निसर्गरम्य उपक्रमात मुला-मुलींनी उत्साही सहभाग घेतला होता. शाळेत मुले शिक्षण तर घेतातच; पण त्या व्यतिरिक्त मुलांना आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव व्हावी, शेतकरी शेतात कसे कष्ट करतो व धान्य पिकवतो हे प्रत्यक्षात बघता यावे, यासाठी वाळवीमधील सर्व विद्यार्थ्यांनी शाळेकडून शेतीविषयक माहिती घेतली, तसेच प्रत्यक्ष शेतीचे काम कसे करतात, याचा अनुभव घेतला.

आपण जेवण करताना अन्न जास्त झाले, तर सहजपणे टाकतो; पण त्यामागे अन्न उगविणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव व्हावी व शेतीची अवजारे कशी हाताळावी, अवजारांची प्रत्यक्ष ओळख, मुक्या जनावरांबद्दल महत्त्व व त्यांच्याबद्दल प्रेम वाढावे, यासाठी सर्व विद्यार्थ्यांना ‘एक दिवस शेतीचा’ म्हणून प्रत्यक्ष शेतात लावणी करायला नेण्यात आले. लावणी करून प्रत्यक्षरीत्या शेतीचा विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला.

राज्यात १ ते १५ ऑगस्टच्या दरम्यान कृषी प्रक्रिया जागृती पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्याच्या पूर्वसंध्येला हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा प्रारंभ लहानग्यांना रानावनातील भटकंतीचा आनंद देत करण्यात आला. शेतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळावी, यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे, वाळवी शाळेकडून शेतीच्या हंगामात हा उपक्रम राबविला जातो. यावेळी विद्यार्थ्यांना एक वेगळाच अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांना वेगळाच आनंद देऊन गेला. उपक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक श्रीकांत काटेलवार व शाळा व्यवस्थापन अध्यक्ष केशव लेकामी, मनकू वड्डे, झिलो लकडा यांच्यासह शेतकऱ्यांनी समरस होऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर निसर्गाच्या सानिध्यात जाऊन प्रत्यक्ष शेतीचा अनुभव देण्याच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!