जागतिक आदिवासी दिनानिमित्त ‘आदिमवाणी’ रेडिओने सुरू केली नवीन कार्यक्रम मालिका

जागतिक आदिवासी दिनानिमित्त ‘आदिमवाणी’ रेडिओने सुरू केली नवीन कार्यक्रम मालिका

पुणे, १२ ऑगस्ट :- आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी राज्यातील कातकरी, कोलाम व माडिया आदिम जमातींच्या बांधवांसाठी जे ‘आदिमवाणी’ नावाचे सामुदायिक रेडिओ केंद्र सुरु केले आहे, त्यावर समस्या निवारण करण्यासाठी आदिवासी दिनानिमित्त एक सहायता नंबर सुरु करण्यात आला आहे.

‘आदिमवाणी’ रेडिओचे प्रक्षेपण नियमितपणे चालू असून केवळ त्यावर मराठीच नव्हे तर माडिया, कोलाम आणि कातकरी या आदिम जमातींच्या स्थानिक भाषांमध्ये प्रक्षेपण चालू आहे. यामुळे शासन आणि आदिम आदिवासी जमाती यांच्यात सुसंवाद निर्माण होत आहे.

‘आदिमवाणी’ वर आदिवासी भागामधील महिलांचे हक्क, त्यांच्यासाठी योग्य कायदेशीर सल्ला – सहाय्य आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठीची माहिती पोहोचवणे, आदिवासी नव युवकांना नवीन कामाच्या संधी आणि स्वयंरोजगाराच्या विविध मार्गांबद्दलची माहिती देणे, आदिवासी शेतकरी मित्रांसाठी नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञान, बियाणे आणि रोपांची खरेदी, तसेच जतन पद्धती आणि विक्री याबद्दल उपयुक्त माहिती देणे, आदिवासी मुला-मुलींना पौगंडावस्थेतील शारीरिक आणि मानसिक बदलांबद्दलची माहिती देणे, शाळकरी मुलांना आणि शाळा मध्येच सुटलेल्यांना शिक्षणाचे इतर मार्ग दाखवणे या सर्व गोष्टी सामुदायिक रेडिओ कार्यक्रमांद्वारे दुर्गमातल्या दुर्गम भागातल्या आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवणे सहज साध्य होणार आहे.

तसेच आदिम आदिवासी समाजामध्ये देखील कलाकार मंडळी असून या रेडिओच्या माध्यमातून त्यांना आपली कला समाजासमोर ठेवण्याची संधी मिळत आहे. श्रोत्यांनाही इथे कामाच्या उपयुक्त गोष्टींसोबतच परंपरागत आदिवासी संगीत आणि लोकगीते यांचा आस्वाद घेता येत आहे. या रेडिओ निमित्ताने माडिया, कोलाम आणि कातकरी तिन्ही भाषांतील व्हॉइस ओव्हर कलाकारांनाही संधी उपलब्ध होत आहे. आदिमवाणीच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे आमचे ध्येय आहे.

जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी रेडिओ ऐकावा यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. कारण रेडिओ अप्लिकेशनला श्रोत्यांकडून प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, ज्यामुळे त्याचे डाउनलोड्सची संख्याही चांगली आहे. शिवाय, आणखी पुढाकार घेऊन आणि श्रोत्यांसाठी अधिक मनोरंजक बनवण्यासाठी, बबल कम्युनिकेशनच्या प्रोग्रामिंग आणि सामग्री टीमने 2 नवीन विशेष वैशिष्ट्ये सादर केली आहेत- 1) वीर गाथा – महाराष्ट्रातील आदिवासी भागातील समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्यकथा. २) समस्या समाधान. तसेच 09 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन असल्याने महाराष्ट्रातील अनेक पीओ कार्यालयात असंख्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात डहाणू येथील कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

याशिवाय आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे देखील आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जॉईंट कमिशनर चंचल पाटील, उपायुक्त हंसध्वज सोनवणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा झाला. या महत्त्वाच्या प्रसंगी ‘आदिमवाणी’च्या नवीन उपक्रमांची माहिती सर्वांना देण्यात आली.

error: Content is protected !!