डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे शिवार फेरीचे आयोजन

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे शिवार फेरीचे आयोजन

गडचिरोली, २६ सप्टेंबर :- डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला विद्यापीठ स्थापना दिनाचे औचित्य साधून २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे ‘शिवार फेरी’ आयोजीत करण्यात आलेली आहे.

सदर शिवार फेरी दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला विकसीत कृषि तंत्रज्ञान, कृषि अवजारे, ठिंबक सिंचन पध्दती, पिक प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना माहीती व मार्गदर्शनाकरीता उपलब्ध करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना विविध पिक पध्दतीचे पीक प्रात्यक्षिक अनुभवता येणार आहे.

शिवार फेरी तसेच थेट पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे मुख्य उदिष्ट म्हणजे शेतकरी, संशोधक, धोरणकर्ते आणि उद्योग भारकांना ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी, अत्याधुनिक कृषि पध्दतीबद्दल जाणून घेण्यासाठी आणि शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल पध्दतीची खात्री करून पीक उत्पादकता वाढवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आहे.

सदर तीन दिवसीय शिवार फेरीमध्ये २२० प्रगत खरीप पिक उत्पादन तंत्राचे २० एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी थेट प्रात्यक्षिके (उदा. तृणधान्य, कडधान्य, कापूस, सोयाबीन, भाजीपाला, फळपीके, फुलपिके, चारा पिके, धान पिके आणि त्यांचे तंत्रज्ञान). १६ खाजगी कृषि निविष्ठा कंपन्यांची थेट प्रात्यक्षिके. विद्यापीठाच्या विविध संशोधन विभागाचे ११०० हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक क्षेत्र म्हणून पाहण्याची संधी उपलब्ध असणार आहे. आपल्या प्रदेशातील कृषि क्षेत्रासमोरील आव्हाने आणि संधी यावर चर्चासत्र. इ. वैशिष्टपूर्ण बाबींचा समावेश असणार आहे.

शिवार फेरी २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान सुरू राहणार असून त्यामध्ये विद्यापिठातील विविध विषयाचे शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करणार आहेत. तरी शेतकरी बंधु-भगिनींनी या शिवार फेरीमध्ये सहभागी होऊन आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असे आवाहन वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली यांनी केले आहे.

error: Content is protected !!