जहाल महिला नक्षलीचे आत्मसमर्पण

जहाल महिला नक्षलीचे आत्मसमर्पण

शासनाने जाहीर केले होते एकुण ११ लाखांचे बक्षीस 

गडचिरोली, ०७ ऑक्टोबर :- शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण ५८६ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. नुकतेच एकुण ११ लाख रुपये बक्षीस असलेली जहाल महिला माओवादी रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी, (वय २८) रा. ईरुपगुट्टा, तालुका भोपालपट्टनम जि. बिजापूर (छ.ग.) हिने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासमोर आत्मसमर्पण केले.

महिला माओवादी रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी ऑगस्ट २००९ ला फरसेगड दलममध्ये सदस्या पदावर भरती होऊन २०१० पर्यंत कार्यरत होती. २०१० ला ओरच्छा दलममध्ये बदली होऊन २०१३ पर्यंत कार्यरत होती. २०१३ ला नॅशनल पार्क एरीया डॉक्टर टीममध्ये बदली होऊन एसीएम (एरीया कमीटी मेंबर) पदावर पदोन्नती होऊन २०१५ पर्यंत कार्यरत होती. सन २०१५ ला सांड्रा दलममध्ये बदली होऊन आजपर्यंत कार्यरत होती.

रजनी वेलादीवर नऊ खुनांसह चकमकीचे चार, जाळपोळीच्या एक गुन्ह्याची नोंद आहे. तिच्यावर राज्य शासनाने सहा लाखांचे व छत्तीसगड सरकारने पाच लाखांचे असे एकूण ११ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी हिला एकुण ४ लाख ५० हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन २०२२ ते २०२३ सालामध्ये आतापर्यंत एकुण १३ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.

error: Content is protected !!