फटाका फॅक्टरीत स्फोट ; सहा महिला कामगारांचा होरपळून मृत्यू

फटाका फॅक्टरीत स्फोट ; सहा महिला कामगारांचा होरपळून मृत्यू

मालकासह दहा महिला कामगार जखमी ; जोतिबानगरातील घटना 

पिंपरी (पुणे), ०९ डिसेंबर :- वाढदिवसाच्या केकवर लावण्यात येणाऱ्या शोभेच्या फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याने सहा महिला कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. यात कारखाना मालकासह १० महिला जखमी झाल्या असून, काहीजण गंभीर आहेत. तळवडे येथील जोतिबानगरात शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. स्फोटामागील आगीचे कारण समजू शकले नाही.

तळवडेतील ‘राणा इंजिनिअरिंग’ या फॅब्रिकेशन शॉपच्या परिसरात फायर क्रेकरचा अनधिकृत कारखाना आहे. येथे पंधरा ते वीस महिला फटाका बनविण्याचे काम करीत होत्या. दुपारी तेथे अचानक आग लागून स्फोट झाला. फायर क्रैकरचे साहित्य आणि दारूने पेट घेतला. कारखान्यास एकच दरवाजा असल्याने महिलांना बाहेर पडता आले नाही.

‘रेड झोन’मध्ये अनधिकृत उद्योग संरक्षण विभागाच्या दारुगोळा कारखान्यामुळे तळवडे परिसर ‘रेड झोन’मध्ये आहे. त्यामुळे येथे बांधकाम किंवा कोणत्याही प्रकल्पास परवानगी देण्यात येत नाही. असे असतानाही अनेक अनधिकृत रोड आणि बांधकामांची उभारणी करून हा शोभेच्या फटाक्यांचा कारखाना बिनदिक्कत सुरू होता.

जखमींची नावे

अपेक्षा तोरणे (वय २६), प्रियंका यादव (३२), कविता राठोड (४५), राधा ऊर्फ सुमन राठोड (४०), उषा पाडवी (४०), रेणुका ताथवडे (२०), कोमल चौरे (२५), शिल्पा राठोड (३१), प्रतीक्षा तोरणे (१६) आणि कारखाना मालक शरद सुतार (४५, सर्व रा. तळवडे)

error: Content is protected !!