छत्रपती शिवाजी महाराज लोकहिताची मूल्य जपणारे राजे – श्रीमंत राजे मुधोजी भोसले

छत्रपती शिवाजी महाराज लोकहिताची मूल्य जपणारे राजे – श्रीमंत राजे मुधोजी भोसले

गोंडवाना विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे थाटात उद्घाटन

गडचिरोली, २३ फेब्रुवारी :- आजघडीला आपण शिवाजी महाराजांची जयंती आणि पुण्यतिथीला आठवण करतो. पण त्यांचे कार्य येणाऱ्या प्रत्येक पिढी साठी प्रेरणादायी आहे. महाराजांचे व्यक्तिमत्त्व वाचले तर ते अधिक चांगले समजू शकते. महाराज हे एकमेव राजे आहेत ज्यांचे ३५० वे स्वराज्यभिषेकाचे वर्ष साजरे होत आहे. ते अन्यायाचे, अत्याचाराचे विरोधक होते. संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराज यांना मनाचे स्थान आहे. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे ते लोकहिताचे मूल्य जपणारे राजे आहेत, असे प्रतिपादन महाराजा ऑफ नागपूर, श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांनी केले.

गोंडवाना विद्यापीठात आज छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. श्रीमंत राजे मुधोजी भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आहेत. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे, प्रमुख वक्ते राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाण, पुणेचे अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव, प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रशांत मोहिते, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. विकास चित्ते प्रभूती उपस्थित होते.

तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात  आले. याप्रसंगी प्रमुख वक्ते राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाण, पुणेचे अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचा विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी, त्यांचे कार्य जाणून घेण्यासाठी तसेच स्वतःची बौद्धिक क्षमता वाढवून विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर फोकस करण्यासाठी करायला हवा. त्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यावर विस्तृत प्रकाश टाकला. शिवाजी महाराजांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन स्वतःचा शोध घ्यावा म्हणजे तुमच्यातूनही कोणीतरी शिवाजी घडेल, असे ते म्हणाले.

समारोपीय भाषणात प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे म्हणाले, शिवाजी महाराजांचे पराक्रम, त्यांच्या अंगी असलेले कौशल्य, सर्व धर्मसमभाव, समानता, स्वातंत्र, बंधुता, माणुसकी ही मूल्ये त्यांनी रुजविली. या अध्यासन केंद्रा मार्फत विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे विचार रुजावे आणि येणाऱ्या प्रत्येक पिढी पर्यंत ते कसे पोहचवता येईल हाच आमचा प्रयत्न आहे.

गोंडवाना विद्यापीठात शिवाजी महाराज अध्यासन केंद्र व्हावे यासाठी माजी सिनेट सदस्य संध्या येलेकर यांनी प्रस्ताव ठेवला होता. त्यासाठी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जनसंवाद विभागाचे स. प्रा. संजय डाफ यांनी श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांचा परिचय करून दिला. वक्ते प्रा. नामदेव जाधव यांचा परिचय मराठीचे स.प्रा. अमोल चव्हाण यांनी करून दिला.

या कार्यक्रमाला अधिष्ठाता विज्ञान आणि तंत्रज्ञान डॉ. अनिल चिताडे, अधिष्ठाता मानव विज्ञान विद्याशाखा डॉ. चंद्रमौली, वित्त व लेखाधिकारी भास्कर पठारे, सिनेट सदस्य स्वरूप तारगे, सतीश पडोळे, माजी सिनेट सदस्य संध्या येलेकर तसेच शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. विकास चित्ते यांनी, संचालन रसायनशास्त्र विभागाचे स.प्रा. प्रशांत ठाकरे यांनी तर आभार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!