वनहक्क पट्ट्यांच्या मालकीमुळे आदिवासींचे जीवन बदलणार – भाग्यश्री आत्राम

वनहक्क पट्ट्यांच्या मालकीमुळे आदिवासींचे जीवन बदलणार – भाग्यश्री आत्राम

आदिवासी लाभार्थ्यांना वनहक्क पट्ट्यांचे वाटप

भामरागड, 23 फेब्रुवारी :- आदिवासी किंवा इतर पारंपरिक वननिवासी हे सुरुवातीपासूनच जंगलांचे संवर्धन करीत आले आहेत. मात्र त्यांना ना हक्काची जमीन, ना सातबारा. केवळ जमीन वाहणे आणि त्यावर उदरनिर्वाह करणे एवढेच त्यांना माहित. आता मात्र शासनाने आदिवासींना वनपट्ट्यांचे मालकी हक्क दिल्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल. परिणामी या वनहक्क पट्‌ट्यांमुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येईल, असे मत माजी जिप अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी व्यक्त केले.

भामरागड तालुका मुख्यालयात आदिवासी लाभार्थ्यांना वनहक्क पट्ट्यांचे वाटप करताना प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार प्रकाश पुप्पलवार, वनपरिक्षेत्र अधिकारी भिसे, भूमी अभिलेख अधिकारी मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे भामरागड तालुकाध्यक्ष रमेश मारगोनवार, अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, ज्ञानेश्वर भांडेकर, किरण उसेंडी, सब्बर बेग मोगल, घिस्सु आतला, राजू पुंगाटी, साईनाथ गव्हारे तसेच आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मागील काही वर्षापासून अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध तालुक्यात प्रलंबित असलेले वन हक्क दावे मंजूर करण्यासाठी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली माजी जिप अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचे प्रयत्न सुरू आहे. नवीन दावे सादर करणे, जुन्या दाव्यातील तृट्यांची पूर्तता करणे तसेच लाभार्थ्यांना घेऊन विविध कार्यालय गाठणे यासाठी त्यांची एक चमू कार्यरत असल्याने येथील बांधवांना वन हक्क पट्टे मिळण्यास मदत होत आहे.

नुकतेच भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील काही वनहक्क पट्टे मंजूर झाले असून माजी जिप अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी काही सनद पट्टे देखील वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे या तालुक्यात आतापर्यंत १०१७ वयक्तिक आणि १०१ सामूहिक पट्टे वाटप करण्यात आले आहे हे विशेष.

error: Content is protected !!