लोकसभा निवडणुकीत ४६५० कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा निवडणुकीत ४६५० कोटींचा मुद्देमाल जप्त

नवी दिल्ली, १७ एप्रिल :- लोकसभा निवडणुकीत पैशांचा दुरुपयोग रोखण्यासाठी केलेल्या कारवाईत आतापर्यंत ४ हजार ६५० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दररोज सरासरी १०० कोटी रुपयांची जप्ती होत असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. धक्कादायक म्हणजे, यामध्ये जवळपास ४५ टक्के वाटा हा ड्रग्जचा आहे.

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ४ हजार ६५८ कोटी रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत जप्त केलेला मुद्देमाल जास्त आहे. लोकसभा निवडणुकीचे प्रत्यक्ष मतदान सुरु होण्यापूर्वीच एवढा मुद्देमाल जप्त झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या ७५ वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक जप्तीची कारवाई यावेळी होण्याच्या मार्गावर आहे. ३ हजार ४७५ कोटी रुपयांचा मुद्देमाल २०१९च्या निवडणुकीदरम्यान जप्त केला होता. यंदा मतदान सुरु होण्यापूर्वीच हा आकडा पार झाला आहे.

या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कारवाईदरम्यान जप्त केलेल्या मुद्देमालात ७५ टक्के वाटा हा ड्रग्जचा होता. आयोगाने लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच वर्षाच्या सुरुवातीपासून याकडे लक्ष केंद्रित केले होते.

निवडणुकीच्या दरम्यान राजकीय नेत्यांना प्रचारात मदत करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. अशा १०६ जणांवर कारवाई झाल्याचे आयोगाने म्हटले आहे. दररोज सरासरी १०० कोटींचा मुद्देमाल जप्त केला जात आहे. ३९५ कोटी रुपये रोख, ४८९ कोटी रुपयांचे मद्य आणि २,०६९ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.

error: Content is protected !!