चामोर्शी नगरपंचायतीने करवसुलीत गाठला उच्चांक

चामोर्शी नगरपंचायतीने करवसुलीत गाठला उच्चांक

२०२३-२४ या आर्थिक वर्षात १ कोटी ५९ लाख रुपये उत्पन्न

पाणीपट्टी कर वसुलीतही उच्चांक गाठत २१ लाखांची वसुली

चामोर्शी, २३ एप्रिल :- नगरपंचायत चामोर्शीला मालमत्ता करातून २०२३-२४ या आर्थिक वर्षात उच्चांकी म्हणजेच १ कोटी ५९ लाख रुपये उत्पन्न मिळाले. नगरपंचायत चामोर्शीच्या इतिहासात प्रथमच १ कोटी ५० लाखांच्यावर कराचे उत्पन्न पोहोचले आहे. ७९.२० टक्के मालमत्ता कर वसुली झालेली आहे. सोबतच पाणीपट्टी कर वसुलीतही उच्चांक गाठत २१ लाखांची वसुली करण्यात आली आहे. याची टक्केवारी ६० टक्के आहे. शहरातील ५ हजार ५०० मालमत्ताधारकांपैकी चार हजार मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. नगरपंचायतीचा उत्पन्नाचा मालमत्ता कर प्रमुख स्रोत आहे. नगरपंचायत हद्दीत ५ हजार ५०० मालमत्ता आहेत. यापैकी चार हजार मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. कर संकलन व कर आकारणी विभागाने गतवर्षी १ कोटी चार लाखांचा कर वसूल केला होता. यंदा तब्बल ५५ लाख रुपये अधिक कर वसूल करण्यात नगरपंचायतीला यश आले आहे.

नगरपंचायतीमार्फत यावर्षी कर भरण्याविषयी जनजागृती करण्यात आली. प्रथमच थकबाकीदारांची मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई करण्यात आली. यामध्ये बीएसएनएल चामोर्शी कार्यालयातील खुर्ची जप्त केली. तसेच पाणीपट्टी थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात आली.

यासोबतच वसुली पथक ढोल वाजवत थकबाकी दारांच्या घरी धडक द्यायचे. याचा परिणाम म्हणून करवसुलीत वाढ झाली. ही वसुली नगर पंचायतीचे मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्या मार्गदर्शनात करनिरीक्षक भारत वासेकर, पाणीपुरवठा अभियंता स्वप्नील पिदूरकर, लिपिक विजय पेद्दीवार, श्रीकांत नैताम, रमेश धोडरे, प्रभाकर कोसरे, हाफिज सय्यद, संतोष भांडेकर, राकेश कोत्तावार तसेच नगरपंचायत चामोर्शीच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने केली.

error: Content is protected !!