वन कर्मचाऱ्यांअभावी निवासस्थाने पडली ओस ; अनेक निवासस्थाने जीर्णावस्थेत

वन कर्मचाऱ्यांअभावी निवासस्थाने पडली ओस ; अनेक निवासस्थाने जीर्णावस्थेत

कर्मचाऱ्यांचा अप-डाऊनवरच भर

गडचिरोली, २३ एप्रिल :- सिरोंचा वनविभागांतर्गत येत असलेल्या आठही वनपरिक्षेत्रांतर्गत वनविभागीय कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेली अनेक निवासस्थाने वनअधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी ओस पडलेली निदर्शनास येत आहेत. यातील अनेक निवासस्थाने तर देखभाल, दुरुस्तीअभावी जीर्णावस्थेत आली आहेत. परिणामी शासनाने या निवासस्थानावर केलेला लाखोंचा खर्च पाण्यात जात आहे. याकडे वनविभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

वनविभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून वनसंपदेचे संरक्षण करावे या स्तुत्य हेतूने कर्मचाऱ्यांसाठी शासनाद्वारे लाखो रुपये खर्ची घालून निवासस्थाने उभारण्यात येतात. सिरोंचा वनविभागांतर्गत सिरोंचा, बामणी, आसरअल्ली, झिंगानूर, देचली, जिमलगट्टा, कमलापूर तसेच प्राणहिता वनपरिक्षेत्र कार्यालय मोडतात. या वनपरिक्षेत्रांतर्गत वनअधिकारी व शेकडो वनकर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, या वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह वनकर्मचारी मुख्यालयी न राहता तालुका स्थळावरुन ये-जा करीत सेवा देत आहेत. परिणामी या वनक्षेत्रातील वनसंपत्तीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून सेवा द्यावी याकरिता वनअधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानेही उभारली आहेत. मात्र, या निवासस्थानी कर्मचारी राहत नसल्याने या इमारतींची दैनावस्था झाली आहे. अनेक इमारती देखभालीअभावी मोडक्या अवस्थेत आली आहेत.

error: Content is protected !!