चारचाकीची दुभाजकाला धडक ; दोन जण ठार, तीन गंभीर

चारचाकीची दुभाजकाला धडक ; दोन जण ठार, तीन गंभीर

साकोली येथील घटना 

साकोली, २७ एप्रिल :- मित्राच्या लग्नावरून परत येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन दुभाजकाला धडक देत उलटले. यात दोन तरुण जागीच ठार झाले; तर तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी रात्री ११:३० ते १२ वाजण्याच्या सुमारास साकोली येथील उड्डाणपुलाखाली नटराज बारसमोर घडली. संदीप श्रावण कूळसुंगे (वय २५, रा. गणेश वॉर्ड, साकोली व सारंग मारुती कत्रेवार (२५, रा. सेंदूरवाफा) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

चालक विशाल देवेंद्र वाघाडे (२५), प्रणय हिरादास बैरागी (२४, दोन्ही रा. साकोली) व कुणाल हेमराज ठाकरे (१९, रा. सेंदूरवाफा) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. विशाल वाघाडे हा त्याचा मित्र वैभव मानकर यांच्या लग्नासाठी सोनका पळसगाव येथे झायलो वाहन क्रमांक एमएच ४०, बीजी २६६० ने गेले होते. लग्न आटोपून साकोलीला परत येत होते. या गाडीमध्ये महिलाही बसल्या होत्या. वाघाडे याने वाहनात बसलेल्या महिलांना लाखांदूर रोडवर सोडले. यानंतर वाहनात बसलेले कुणाल हेमराज ठाकरे व सारंग मारुती कत्रेवार या दोघांनाही घरी सोडण्यासाठी तो सेंदूरवाफाच्या दिशेने जात होते. वाहन भरधाव वेगाने असल्याने नटराज बारसमोर चालक विशाल वाघाडे याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन दुभाजकावरील पिल्लरला आदळून उलटली.

यात वाहनात असलेले संदीप कुरसुंगे व सारंग कत्रेवार या दोघांचा जागीच मृत्यू झाला; तर चालक विशाल वाघाडे, कुणाल ठाकरे व प्रणय बैरागी हे तिघेही गंभीर जखमी झाले. जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून साकोली येथील आशीर्वाद नर्सिंग होम येथे उपचारार्थ दाखल केले.

चालक वाघाडे याच्यावर भादंविच्या कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ तसेच सहकलम १८४ मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तपास साकोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमाकांत कोकाटे हे करीत आहेत

error: Content is protected !!