वीज कोसळून तीन जनावरे ठार 

वीज कोसळून तीन जनावरे ठार 

सुकळी, जांब लोहारा येथील घटना ; शेतकरी झाला हवालदिल

भंडारा, २३ एप्रिल :- मागील पंधरवाड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचे थैमान थांबलेले नाही. सोमवारीही जिल्ह्यात वादळासह गारांचा पाऊस झाला. यात सुकळी आणि जांब लोहारा येथे वीज कोसळून तीन बैलांचा मृत्यू झाला. तर जिल्ह्यातील काही भागात झालेल्या पावसामुळे शेतमालाचेही नुकसान झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास वीज पडल्याने सौरभ सुभाष बोरकर यांची शेतात बांधलेली बैलजोडी मरण पावली. यात त्यांचे एक लाखाचे नुकसान झाले. सिहोरा परिसरात सोमवारी दुपारी २ वाजता गारपिटीसह आलेल्या पावसात वीज पडून सुकळी नकुल गावात गोठ्यात बांधलेल्या बैलाचा मृत्यू झाला. जनावर मालक हंसराज राहंगडाले यांचे यात ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. या दोन्ही शेतकऱ्यांनी आर्थिक नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

हवामान खात्याने सोमवार व मंगळवारला विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविला. अंदाजानुसार सोमवारी भंडारा शहरात सकाळी व दुपारच्या सुमारास पाऊस बरसला. सततच्या ढगाळ व दूषित हवामानामुळे शेत पिके संकटात सापडली आहेत. धान पीक अंतिम टप्प्यात असल्यामुळे गारपिटीच्या संकेताने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. कापणीला आलेला धान वादळामुळे मोडून पडला, ओंब्या तुटून खाली पडल्या, पावसात सापडलेले धान काळवंडण्याचा धोका आहे.

रविवारपर्यंत तापमान ४० अंशाच्या पुढे चढला होता. असह्य ऊन तापत असल्याने सर्वसामान्यांनी आरोग्य जपण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले होते. मात्र, रात्री दरम्यान अचानक आकाश ढगांनी भरून आले. एक-दोन ठिकाणी हलका पाऊस झाला. दिवसभर दमट वातावरण होते.

सुकळी नकुल गावात हंसराज राहंगडाले घराच्या शेजारीच वीज कोसळली. त्यांनी घराशेजारी असणाऱ्या गोठ्यात जनावरे बांधून ठेवली होते. पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्याने आधी म्हशी सोडून घरी आणल्या. नंतर गोठ्यातील बैल आणण्यासाठी जात असताना काही अंतरावरच वीज कोसळल्याने बैलाचा मृत्यू झाला. गोठ्यापर्यंत शेतकरी पोहचला नसल्याने सुदैवाने तो बचावला.

error: Content is protected !!