आयएमए चंद्रपूरला देशात एक नंबरवर आणण्‍यासाठी प्रयत्‍न करा – ना. सुधीर मुनगंटीवार

आयएमए चंद्रपूरला देशात एक नंबरवर आणण्‍यासाठी प्रयत्‍न करा – ना. सुधीर मुनगंटीवार

पदग्रहण समारंभात केले आवाहन

चंद्रपूर, 22 एप्रिल : आयएमए ही जिल्‍ह्यातली डॉक्‍टरांची प्रतीथयश संघटना आहे. मागील काही वर्षांपासून चंद्रपूर जिल्‍ह्यातील आयएमएच्‍या पदाधिऱ्यांनी अतिशय उत्‍कृष्‍ट काम केले आहे. त्‍यामुळे आता सर्वोत्‍तम काम करून देशात आपला जिल्‍हा नंबर एक करण्‍यासाठी आपण प्रयत्‍न करावेत, असे आवाहन महाराष्‍ट्र राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य, मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री तथा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

चंद्रपूर आयएमएच्‍या पदग्रहण समारंभात प्रमुख अतिथी म्‍हणून ते बोलत होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्‍हणून राजुरा येथील आमदार सुभाष धोटे, आयएमएचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष डॉ. शिवकुमार ऊत्‍तुरे, महाराष्‍ट्र मेडिकल न्‍सीलचे अॅडमिनीस्‍ट्रेटर डॉ. विंकी रूघवानी, जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक डॉ. महादेव चिंचोळे, भाजपाचे जिल्‍हा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे व अन्‍य डॉक्‍टर्स उपस्थित होते.

यावेळी अध्‍यक्षा डॉ. कीर्ती साने, सचिव डॉ. कल्‍पना गुलवाडे, कोषाध्‍यक्ष डॉ. अपर्णा देवईकर यांनी आपला पदभार नवनियुक्‍त पदाधिकाऱ्यांना सुपुर्द केला. यामध्‍ये नवनियुक्‍त अध्‍यक्ष डॉ. संजय घाटे, सचिव डॉ. प्रविण पंत, कोषाध्‍यक्ष डॉ. अप्रतिम दीक्षित यांचा समावेश आहे. याप्रसंगी डॉ. कीर्ती साने, डॉ. कल्‍पना गुलवाडे, डॉ. अपर्णा देवईकर तथा डॉ. संजय घाटे यांचे समयोचित भाषण झाले.

याप्रसंगी बोलताना ना. मुनगंटीवार म्‍हणाले, माझ्या मंत्री पदाच्‍या कार्यकाळात चंद्रपूरला शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, कॅन्‍सर हॉस्पिटल, शंभर खाटांचे कामगारांचे रूग्‍णालय मंजूर झाले आहे. आयएमएला एक स्‍थायी स्‍वरूपाचा हॉल असावा यासाठी मी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात जागा पाहण्‍यासाठी आपल्‍याला आधीच सुचविले होते. त्‍यासंदर्भात पाठपुरावा करून लवकरात लवकर हा हॉल बांधण्‍यासाठी आपण प्रयत्‍न करू. याप्रसंगी जुन्‍या चमुने उत्‍तम काम केले असे कौतुकास्‍पद उद्गार ना. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी काढले. त्‍याचबरोबर नवीन चमूची जबाबदारी वाढली आहे. त्‍यामुळे यापुढे त्‍यांना दुप्‍पट उत्‍साहाने काम करावे लागेल.

ना. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, मी परदेशात गेलो असताना तेथील वैद्यकिय सेवा उत्‍तम असेल असा माझा समज होता. परंतु परदेशापेक्षा भारतातील वैद्यकिय सेवा जास्‍त चांगल्‍या आहेत आणि त्‍या तुमच्‍यामुळेच शक्‍य आहे. अठराव्‍या शतकात विज्ञान, तंत्रज्ञान कमी होते. परंतु परस्‍परांमध्‍ये प्रेम होते. आता विज्ञान, तंत्रज्ञान अद्ययावत झाले आहे. परंतु एकमेकांमधील स्‍नेह कमी झाला आहे. अश्‍या वेळेला आयएमएने या संस्‍थेला एक परिवार म्‍हणून एकत्र करावे व कार्यक्रमांच्‍या माध्‍यमातून एकमेकांमधील स्‍नेह वाढविण्‍याचे काम करावे.

error: Content is protected !!