चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार 

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार 

दवडीपार पुलावरील घटना

भंडारा, २५ एप्रिल :- दुचाकीने गावाकडे परत येत असताना चारचाकीने जोरदार धडक दिली. यात ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कुणाल सुरमवार (रा. अड्याळ) असे मृताचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना सोमवारी रात्री ९:४५ वाजताच्या सुमारास भंडारा पवनी महामार्गावरील दवडीपार पुलावर घडली. या घटनेने गावात शोककळा पसरली.

माहितीनुसार, कुणाल व त्याचा मित्र हे दुचाकीने भंडाराहून अड्याळकडे परत येत होते. दवडीपार जवळील पुलावर विरुद्ध दिशेने सुसाट वेगाने येणाऱ्या चारचाकी क्रमांक एमएच ३६ – एजी ६१५२ ने कुणालच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात कुणालचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र जखमी झाला. घटनेनंतर अपघातग्रस्त दुचाकी आणि चारचाकी कारदा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी कुणालचे कुटुंबीय कारधा पोलिस ठाण्यात आले होते तसेच काही काळ तणाव निर्माण झाला होता. उल्लेखनीय म्हणजे ज्या चारचाकी वाहनाने कुणालच्या दुचाकीला धडक दिली तो वाहन चालक एक पोलिस कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

मंगळवारी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात कुणालच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करून दुपारी १२ वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. एकीकडे गावात घोडायात्रेची समाप्ती होत असताना कुणालच्या अपघाती मृत्यूने गावात शोककळा पसरली.

error: Content is protected !!