शिकारीपूर्वीच शिकाऱ्याला केले जेरबंद!

शिकारीपूर्वीच शिकाऱ्याला केले जेरबंद!

वनविभागाची कारवाई ; अस्वलाच्या दोन नखांसह घातक शस्त्रे जप्त

भंडारा, ०३ मे :- मोटारसायकलने संशयास्पद स्थितीत फिरताना एका शिकाऱ्याला शस्त्रांसह वनविभागाच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. वनपरिक्षेत्र अड्याळअंतर्गत सहवनक्षेत्र किटाडी देवरी/ह. कक्ष क्रमांक २१३ संरक्षित वनजंगल परिसरात ही कारवाई करण्यात आली. तेजाबसिंग कांचनसिंग रामगडे (वय ३०) झिरोबा (टोली) लाखांदूर असे आरोपीचे नाव आहे. ही घटना १ मे ला सकाळी ९:३० वाजेदरम्यान घडली.

गुप्त माहितीच्या आधाराने बीटरक्षक नितीन पारधी तीन दिवसापासून संशयित आरोपीच्या मागावर होते. घटनेच्या वेळी बीटरक्षक पारधी एकटेच कर्तव्यावर होते. त्यांनी लगेच वनपरिक्षेत्राधिकारी घनश्याम ठोंबरे यांना माहिती पुरविली. त्यांच्या मार्गदर्शनात नियोजन आखून आरोपीला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्या मोटारसायकलच्या पेट्रोल टॅकवरील खताच्या बॅगमध्ये लोखंडी सुरा, काता असे शिकारीचे साहित्य लपविलेले आढळले. यावरून त्याचा शिकारीचा डाव असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याला अटक करून लाखनी न्यायालयात हजर करण्यात आले असता, ६ मे पर्यंत चार दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली.

गुन्ह्याचा पुढील तपास उपवनसंरक्षक राहुल गवई भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक सचिन निलख (रोहयो, वन्यजीव), वनपरिक्षेत्राधिकारी घनश्याम ठोंबरे, रुपेश गावित, संजय मेंढे करीत आहेत. क्षेत्र सहायक मुकेश श्यामकुवर किटाडी, विनोद पंचभाई, दीपक रंगारी, बीटरक्षक नितीन पारधी, वनपाल दौलतगीर रिघनार्थी (तेंदू), बीटरक्षक सुधीर कुंभरे, संदीप गायकवाड, रीना देशमुख, सविता रंगारी, संदीप भुसारी, नीलेश श्रीराम, रूपाली घोनमोडे, प्रशांत गजभिये, कृष्णा सानप, नंदेश्वर हटवार, मंदा गिरेपुंजे यांनी या कारवाईत सहकार्य केले.

अधिक तपासासाठी लाखांदूर येथे आरोपीच्या घरी वनविभाग व पोलिस विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी झडती घेतली. यावेळी घरात लपविलेली अस्वलाची दोन नखे त्याने काढून दिली. ही नखे त्याच्याकडे कशी आली, शिकार केली होती का, त्याचे अन्य सहकारी कोण, या बाबी तपासात स्पष्ट होणार आहेत.

error: Content is protected !!