पाण्याचे संवर्धन सर्वांचीच नैतिक जबाबदारी – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर.आर. पाटील

पाण्याचे संवर्धन सर्वांचीच नैतिक जबाबदारी – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर.आर. पाटील

महात्मा गांधी महाविद्यालयात “रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वॉटर कन्झर्वेशन” या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा

आरमोरी, २९ एप्रिल :- राज्यघटनेत सर्वांनाच पिण्यायुक्त पाणी मिळेल, अशी तरतूद असली तरी पाणी संवर्धन करणे केवळ शासनाची जबाबदारी ठरत नसून प्रत्येकाला पाणी संवर्धन करण्यासाठीची जबाबदारी घ्यावी लागेल. खरंतर हि सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. भविष्यात पाणी पातळीचे संकट उभे ठाकणार असून नियोजनबद्ध पाणी उपसा व्हावा व अधिकाधिक पाण्याच्या साठवण करण्याच्या शाश्वत पद्धतीचा अवलंब केला जावा. याविषयी जनमानसाने कृतीशील होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.आर. पाटील यांनी केले.

महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली, जलविज्ञान प्रकल्प, भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा गडचिरोली व भूगर्भशास्त्र विभाग महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने “रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वॉटर कन्झर्वेशन” या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा नागपूर विभाग उपसंचालक डॉ. चंद्रकांत भोयर, वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. मंगेश चौधरी, वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. अभिजित धाराशिवकर, प्राचार्य साईनाथ अद्द्लवार, अमित फुंडे, भूगर्भशास्त्र विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत डोर्लीकर, शेखर चहांदे, पाटबंधारे विभागाच्या सहायक कार्यकारी अभियंता श्रीमती पानतावणे यांची उपस्थिती होती.

यावेळी आर.आर. पाटील यांनी मानवाला स्वच्छ पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे.  जलस्रोत मर्यादित असल्यामुळे त्यावर शासनाद्वारा अनेक उपाययोजनात्मक कायदे केलेले आहे.  पाण्याचा योग्य वापर होण्याच्या दृष्टीकोनातून पर्यावरण विषयक असलेल्या कायद्याबद्दल विस्तृत माहिती आपल्या मार्गदर्शनातून करून दिली.

या राज्यस्तरीय कार्यशाळेतील प्रथम तांत्रिक सत्रातील विषयतज्ञ म्हणून वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. अभिजित धाराशिवकर यांनी भूजल ताळेबंद या विषयावर मत व्यक्त कारताना सांगितले कि, भूजल पातळी दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे भविष्यातील मानवी जीवन धोक्याचे आहे, याची जाणीव उन्हाळयात नाही तर इतर ऋतूत सुद्धा दिसून येते. जनजागृतीकरिता पाणी बचतीसाठी भूजलाचा ताळेबंद करावा असे प्रतिपादन त्यांनी केले.

या राज्यस्तरीय कार्यशाळेतील द्वितीय तांत्रिक सत्रात डॉ. चंद्रकांत भोयर यांनी भूजलसाठा, संचयन, संकलन करणे एवढेच नव्हे तर प्रत्येकाने पाण्याचा अपव्यय न करता आवश्यक तेवढाच पाण्याचा वापर करून सामूहिक समरसता सोडण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, मानवी जीवनासाठी भूजलसाठा मर्यादित असल्याने योग्य ती प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर होण्याकरिता प्रयत्न करावा, असे मत व्यक्त केले.

या कार्यशाळेच्या प्रश्न उत्तराच्या सत्रात उपस्थित प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मान्यवर वक्त्यांनी समाधानकारक उत्तरे देऊन हे सत्र यशस्वी केले.

कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ. लालसिंग खालसा यांनी अध्यक्षीय मनोगतातून २१ व्या शतकातील मानवी जीवनाचा शास्वत विकास करतांना औद्योगिकीकरण जसी काळाची गरज आहे हे लक्षात घेता पर्यावरणाचे सुद्धा संतुलन राखले गेले पाहिजे, असे मत व्यक्त केले. या राज्यस्तरीय कार्यशाळेला भूजल तज्ञ सचिन वरघंटीवार, भूवैज्ञानिक वैभव श्रीरामे, डॉ. गुणवंत वाडपल्लीवार, डॉ. वरंभे प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यशाळेच्या दुसऱ्या टप्प्यात जलप्रकल्प भेटीचे नियोजन केल्या गेले या भेटीत कसावी-उसेगाव रोड वरील पाटबंधारा प्रकल्पाला सर्व मान्यवर तथा संशोधक विद्यार्थ्यांनी भेट दिली. कार्यशाळेचे प्रास्तविक कार्यशाळेचे संयोजक डॉ. चंद्रकांत डोर्लीकर यांनी केले. संचलन डॉ. विजय रेवतकर यांनी केले तर आभार डॉ. प्रियदर्शन गणवीर यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!