‘त्या’ नराधमांना फाशीची शिक्षा द्या ; विविध संघटनांची मागणी

‘त्या’ नराधमांना फाशीची शिक्षा द्या ; विविध संघटनांची मागणी

देवरी, २३ एप्रिल :- तालुक्यातील चिचगड पोलिस स्टेशन हद्दीतील ककोडी क्षेत्रात असलेल्या ग्रामपंचायत गोटानपार येथे मानवी मन सुन्न करून टाकणारी घटना घडली. लग्नकार्यात आलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याची घटना याच गाव जंगल परिसरात २० एप्रिल रोजी उघडकीस आली होती. या घटनेमुळे देवरी तालुक्यासह अवघा गोंदिया जिल्हा हादरला. या प्रकरणातील आरोपींना त्वरित पकडून फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी देवरी तालुक्यातील बिरसा ब्रिगेडसह अनेक संघटनांनी सोमवारी (दि.२२) राणी दुर्गावती चौक येथे एकत्र येऊन मोर्चा काढला. राणी दुर्गावती चौक ते तहसील कार्यालयापर्यंत पैदल मार्च करीत नराधमाला त्वरित अटक करा, आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी केली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले.

गोठानपार येथे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वराचा विवाह सोहळा १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता पार पडला. याच लग्नात अल्पवयीन बारा वर्षीय मुलगी आली होती. दरम्यान, अंधाराचा फायदा घेऊन नराधमांनी त्या चिमुकलीचे अपहरण करून गावाशेजारी असणाऱ्या जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर तिच्या डोक्यावर दगडाने वार करून हत्या केली. या घटनेला तीन दिवसांचा कालावधी लोटला असून, या प्रकरणातील आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे आदिवासी समाजबांधवांमध्ये रोष व्यक्त होत आहे. पोलिसांच्या तपासकार्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. पोलिस विभागातर्फे आरोपींना पकडण्यासाठी पथक गठित केले असले तरी तीन दिवस लोटूनही आरोपी मोकाट फिरत आहेत. आरोपींचा शोध घेऊन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी (दि.२२) अनेक संघटनांनी एकत्र येत तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. तसेच या घटनेचा निषेध नोंदविला. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!