महिलांनी दारूविक्रेत्यांना शिकवला धडा ; ८ दारूविक्रेत्यांचा मुद्देमाल नष्ट

महिलांनी दारूविक्रेत्यांना शिकवला धडा ; ८ दारूविक्रेत्यांचा मुद्देमाल नष्ट

चामोर्शी, ३० एप्रिल :- तालुक्यातील नवेगाव रयतवारी येथे अवैध दारूविक्री सुरु असल्याने गावासह परिसरातील लोकांना त्रास सहन करावा लागत होता. गावातील अवैध दारूविक्री थांबिण्यासाठी विक्रेत्यांना सूचना करूनही त्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. त्यामुळे मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी अहिंसक कृती करीत ८ दारूविक्रेत्यांकडील १८ हजार ४०० रुपयांची देशी व मोहफुलाची दारू नष्ट करण्यात आली.

नवेगाव हे तळोधी क्षेत्रातील वर्दळीचे गाव आहे. या गावात सात दारूविक्रेत्यांच्या माध्यमातून देशी, विदेशी, मोहफुलाची दारू विक्री चालत आहे. यामुळे व्यसनाचे प्रमाण वाढले असून महिलांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, तळोधी येथे मागील दोन महिन्यांपासून दारू बंदी आहे. त्यामुळे परिसरातील मद्यपी दारू पिण्यासाठी नवेगाव गावाकडे येतात. अशातच गावातील महिलांनी एकत्र येत दारूबंदीचा निर्णय घेतला. लगेच निर्णयाची अंमलबजावणी करीत दारूविक्रेत्यांना अवैध दारूविक्री बंद करण्याची सूचना केली. तरीसुद्धा विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. त्यामुळे मुक्तिपथच्या सहकार्याने गावातील महिलांनी अहिंसक कृती केली असता, एका विक्रेत्याकडे पाण्याची कॅनमध्ये मोहफुलाची दारू आढळून आली. परंतु दारू आणून देणाऱ्याने घटनास्थळावरून पळ काढला. इतर विक्रेत्यांकडून मिळून आलेली देशी, विदेशी व मोहफुलाची दारू नष्ट करण्यात आली. जवळपास १८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करीत पुन्हा अवैध दारूविक्री न करण्याची तंबी देण्यात आली. तसेच ग्रामपंचायत समितीची सभा घेऊन दारूविक्रेत्यांकडून दंडाची रक्कम आकारण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक आनंद इंगळे, वर्षा लीलाधर सातपुते, वर्षा मेश्राम, माया टिकले, मीना नैताम, माजी पोलिस पाटील व गावातील बहुसंखेने महिला उपस्थित होत्या.

error: Content is protected !!