तपासणी, उपचार, सर्वेक्षण, जनजागृती व लोकसहभाग हि पंचसुत्री ठरली लक्षवेधी

तपासणी, उपचार, सर्वेक्षण, जनजागृती व लोकसहभाग हि पंचसुत्री ठरली लक्षवेधी

सतत तीन वर्षापासुन हिवताप प्रादुर्भाव कमी करण्याचा ठरला रामबाण उपाय
                               
गोंदिया, ३० एप्रिल :- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असतो. गावोगावी पाणी साचण्याचे डबके तयार होतात. भातशेती व तलावांचा जिल्हा म्हणुन जिल्ह्याची ओळख आहे.पाणी साचण्याच्या जागेत डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे जिल्ह्यात अनेक भागात हिवताप, आणि तापाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतात. यामुळे नागरिकांनी परिसर स्वच्छता, कोरडा दिवस पाळणे आणि घराजवळ पाणी साचण्याच्या जागा नष्ट कराव्यात, जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी महत्वाचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी सतत केले आहे. तर तपासणी, उपचार, सर्वेक्षण, जनजागृती व लोकसहभाग हि पंचसुत्री जिल्ह्यात लक्षवेधी ठरल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी म्हटले आहे.

कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी जिल्ह्यात गृहभेटीच्या माध्यमातुन आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांच्या माध्यमातुन विशेष सर्वेक्षण मोहिम यशस्वी ठरत आहे. घरातील वापरण्यासाठी भरण्यात येणारे पाणीसाठे तपासून पाणीसाठ्यात डासाच्या अळ्या आढळून आल्यास ती भांडी रिकामी करणे, रिकामे करता न येणाऱ्या पाणी साठ्यामध्ये टेमिफॉस किंवा बेटचे द्रावण टाकणे महत्वाचे असते. ताप सदृश लक्षणे असलेल्या लोकांचे आर.डी.के. किट द्वारे रक्त तपासणी करण्यात येत असते. तरी घरी येणाऱ्या पथकाला सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. आठवड्यातून एक दिवस शनिवार कोरडा दिवस म्हणून पाळण्यात यावा. त्या दिवशी आपल्या घरातील सर्व पाणीसाठे रिकामी करून स्वच्छ घासून पुसून कोरडे करावे अशा सूचना सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित वाघमारे यांनी नागरिकांना केल्या आहे.

गेल्या तीन वर्षाचे हिवताप दुषित रुग्णांची आकडेवारी बघीतली तर वर्ष 2021 मध्ये 499, वर्ष 2022 मध्ये 373 तर आताच संपलेले वर्ष 2023 मध्ये 288 हिवताप रुग्ण निघालेले आढळले. जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत सतत तीन वर्षापासुन राबविण्यात आलेली पंचसुत्री रामबाण ठरल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी म्हटले आहे. गेल्या दोन वर्षापासुन तत्कालीन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांच्या नाविन्यपुर्वक संकल्पनेतुन जिल्ह्यातील गावोगावी सामुहिक गप्पी मासे सोडणे दिवस राबविण्यात आले. लोकसहभागातुन हा दिवस साजरा करण्याचा नाविन्यपुर्वक उपक्रम ग्रामपंचायती मार्फत राबविण्यात आला. हिवतापाचा प्रादुर्भाव कमी होण्यास हि मोहिम लाभदायक ठरल्याचे डॉ. विनोद चव्हाण यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!