चोरट्यांनी एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली 

चोरट्यांनी एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली 

भंडारा शहरातील प्रकार ; दागिन्यांसह २ लाख रुपयांची चोरी 

भंडारा, २४ एप्रिल :- सोमवारी मध्यरात्री जवाहरनगरसह भंडारा शहरात चोरट्यांच्या टोळीने अक्षरशः धुमाकूळ घातला. एकाच रात्रीतून जवाहरनगरात दोन, तर भंडाऱ्यात सात दुकानांना लक्ष्य केले. दुकानांचे शटर वाकवून वेगवेगळ्या भागात या चोऱ्या झाल्या. यात एका ज्वेलर्सही समावेश असून सर्व ठिकाणचा चोरीस गेलेला एकूण मुद्देमाल जवळपास दोन लाखांवर आहे.

एकापाठोपाठ एक सात दुकांनांचे शटर फोडले असल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आला. ही वार्ता शहरात पसरताच एकच खळबळ उडाली. अनेक व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी आपल्या प्रतिष्ठानाकडे धाव घेऊन कुलूप सुरक्षित असल्याची खात्री करून घेतली.

रात्री एक ते अडीच वाजेच्या सुमारास फक्त अडीच तासांत हे सर्व प्रकार घडले. चोरीची सुरुवात जिल्ह्यात जवाहरनगरतून झाली. जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावरील पिपरी पुनर्वसन येथील किराणा दुकानाचे शटर वाकवून चोरी केली. येथील ६ हजार रुपयांची रक्कम काऊंटरमधून नेली. नंतर पेट्रोल पंपाजवळील एका दारूच्या दुकानाचे शटर फोडून प्रवेश केला. या दोन्ही घटना एक ते सव्वावाजेदरम्यान घडल्या. यानंतर चोरटे भंडारा शहरात पोहोचले. जिल्हा परिषद चौकातील अनिल चरडे यांच्या आनंदा किराणा या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी प्रवेश केला. काऊंटरमधील १३ हजार रुपयांची रक्कम आणि काजूची काही पाकिटे चोरून नेली. त्यानंतर जवळच असलेल्या मेडिक्यूअर फार्मसीचेही शटर वाकवून तिथून सुमारे दोन हजार रुपयांची रक्कम नेली. त्यानंतर राजीव गांधी चौकातील बिकानेर स्वीट मार्टचेही शटर तोडले. मात्र, तिथे त्यांच्या हाती काहीच रक्कम लागली नाही. पुढे मिस्किन टैंक चौकातील सय्यद असीफ अली यांच्या जुम मेन्स या दुकानातील कापड आणि रक्कम चोरून नेले. या दुकानाजवळच असलेल्या चेतन भैरम यांच्या गायत्री स्वदेशी या दुकानात काऊंटरमधील १० हजारांची रक्कम चोरून नेली.

त्यानंतर हेडगेवार चौकाकडे चोरट्यांनी मोर्चा वळविला. तिथे अनिल वधवानी यांच्या पंचशील किराणा स्टोअर्सचे कुलूप फोडले. काऊंटरमधील ७ हजार रुपयांची रक्कम चोरून नेली. त्याच चौकात पुढे काही अंतरावरील प्रशांत निनावे यांच्या गणेश ज्वेलर्सचे शटर तोडले. तिथे शोकेसमध्ये ठेवलेले १ लाख ५० हजारांचे दागिने आणि १० हजार रुपयांची रक्कम चोरून नेली.

पोलिस निरीक्षक सुभाष बारसे यांनी दिलेल्या माहिती- नुसार, दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांचे नंबरही सीसीटीव्हीच्या मदतीने ट्रेस झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

चोरट्यांनी सर्वच ठिकाणी एकाच पद्धतीने शटर वाकवून दुकानात प्रवेश केल्याचे दिसत आहे. कोणतेही शस्त्र न वापरता अगदी शिताफीने शटर ओढून वाकवीत असल्याचे काही दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे फक्त दीड ते दोन मिनिटांत त्यांनी शटर वाकविल्याचे दिसत आहे. यावरून हे चोर निष्णांत असावे, असा अंदाज बांधला जात आहे.

error: Content is protected !!