आयपीएलवर ऑनलाइन सट्टा ; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

आयपीएलवर ऑनलाइन सट्टा ; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

सट्टेबाजाला अटक ; साथीदारावरही गुन्हा दाखल

गडचिरोली, ०४ मे :- आयपीएलवर ऑनलाइन सट्टा (जुगार) खेळणाऱ्या एका आरोपीला ३ लाख ६६ हजार ९०० रुपये रोकड व चारचाकी वाहनासह १ मे रोजी अटक करण्यात आली. देसाईगंज पोलिसांनी ही कारवाई विर्शी टी- पॉइंटवर केली. याप्रकरणी त्याच्या साथीदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून रोख रकमेसह दोन मोबाइल व चारचाकी वाहन असा एकूण १६ लाख ३१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

देसाईगंज पोलिस स्टेशनच्या हद्दीत आयपीएल सट्टा खेळला जात असल्याची माहिती प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक अजय जगताप यांना मिळाली. त्यांच्या आदेशानुसार पीएसआय ज्ञानेश्वर धनगर, पोलिस अंमलदार विलेश ढोके, संतोष सराटे व विलास बालमवार यांनी विर्शी टी- पॉइंट चौकात सापळा रचून नाकाबंदी केली. नाकाबंदीदरम्यान एमएच ३३ एसी ५४४३ क्रमांकाच्या वाहनाला थांबवून चौकशी केली. तेव्हा वाहनचालकाने चेतन पुरुषोत्तम मस्के, रा. कोरेगाव, ता. देसाईगंज असे आपले नाव सांगितले. वाहनाची झडती घेतली असता त्यात वापरातील दोन मोबाइल व वाहनात ३ लाख ६६ हजार ९०० रुपये रोख रक्कम आढळली.

चेतन मस्के याची सखोल चौकशी केली असता सर्च इंजिनच्या साहाय्याने वेबसाइटचा वापर करून युजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने नवीश नरळ, रा. शेगाव, ता. वरोरा जिल्हा चंद्रपूर याच्या सहकार्याने आयपीएलवर सट्टा खेळत असल्याचे त्याने सांगितले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या नेतृत्वात, पोलिस निरीक्षक अजय जगताप, पीएसआय ज्ञानेश्वर धनगर यांनी केली.

error: Content is protected !!